मातीचा नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत

              

          नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले पाहिजे त्यासाठी संतुलित खतांचा वापर करावा लागतो. खतांचा संतुलित वापर करण्यासाठी आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे कोणते जास्त प्रमाणात आहे हे माहीती असणे आवश्यक आहे. आपल्या जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे व त्यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. 

- सर्वप्रथम मातीचा नमुना ज्या ठिकाणाहून घ्यायचा त्या जागेच्या दगड-गोटे काडीकचरा इत्यादी बाजूला करावे नंतर साधारण तीस सेंटीमीटर खोल V आकाराचा खड्डा खोदून माती बाहेर काढा.
- खुरप्याच्या सहाय्याने खड्ड्यात वरपासून खरडावे व साधारण दोन सेंटीमीटर जाडीचा थर खरडावा व ती माती जमा करवी.
- अशा प्रकारे सात ते आठ वेगवेगळ्या ठिकाणाहून मातीचे नमुने घ्यावेत सर्व ठिकाणाहून घेतलेले नमुने व्यवस्थित मिक्स करून साधारण अर्ध्या किलो मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा.
नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी ?
१) नमुना पिकाची  काढणी झाल्यानंतर नांगरणी पूर्वी घ्यावा.
२) उभ्या पिकातील नमुना घ्यायचा असल्यास दोन ओळींतील जागेमधून नमुना घ्यावा.
३) शेतात रासायनिक खते टाकल्यापासून दोन ते अडीच महिने नंतरच नमुना घ्यावा.
४) प्रत्येक शेतातील नमुने वेगळे ठेवावे एकमेकात मिसळून नये.
५) रासायनिक खताच्या पिशवीचा वापर नमुना घेण्यासाठी करू नये.
६) सुश्म अन्द्रनव्यांचे प्रमाण तपासायचे असल्यास कोणत्याही धातूचे साहित्य नमुना गोळा करण्यास वापरू नये.
७) उकिरडा,झाडाखालील माती, विहरी किंवा शेतीचे बांध, जनावर बांधण्याच्या जागा इत्यादी ठिकाणावरून मातीचे नमुने घेऊ नये.
८) मातीचे नमुने घेताना गावातील क्षेत्रीय कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे उदा. कृषी सहाय्यक

मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते?
१) शेतकऱ्याचे नाव व पूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक क्रमांक
२) नमुना घेण्याची तारीख
३) गट नंबर /सर्वे नंबर
४) शेती प्रकार बागायती कोरडवाहु
५) ओलितीचे साधन
६) जमिनीचा निचरा
७) जमिनीचा प्रकार
८) जमिनीचा उतार
९) जमिनीची खोली
१०) मागील हंगामातील पिके त्याचे उत्पादन
११) मागील हंगामात  वापरलेले खते व त्याचे प्रमाण
 १२) पुढील हंगामात घ्यावयाची पिके व त्यासोबत त्याचे वाण.
अशाप्रकारे सर्व माहिती भरून आपण आपल्या मातीचा नमुना जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात  पाठवू शकतो.
 माती परीक्षण कशासाठी करावे त्याचे काय फायदे होतात ?
१) खतांचा संतुलित वापर होण्यास मदत होते. 
२) उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते.
३) संतुलित खतांचा वापरामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.
४) उत्पन्नात वाढ होते.
असे एक ना अनेक फायदे माती परीक्षण केल्यास दिसून येतील.म्हणुन शेतकरी बांधवांनी आपल्या काळ्या आईचे आरोग्य जाणुन घ्यावे व त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.

 महेश देवानंद गडाख                                            
   MSc(Agri)
     

Reference- Krishidarshani 2020, MPKV Rahuri                                 
                                           

0/Post a Comment/Comments